Home क्राईम आरमोरीतील अवैध दारूसाठ्याचे गोदाम पोलिसांच्या पुढाकाराने पाडले

आरमोरीतील अवैध दारूसाठ्याचे गोदाम पोलिसांच्या पुढाकाराने पाडले

नगर परिषदेच्या समन्वयाने कारवाई

आरमोरी : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारु विक्री व वाहतुक करण्यासाठी दारूचा साठा करण्यासाठी वापरल्या जाणारे आरमोरीतील अनधिकृत गोदाम पोलिसांच्या पुढाकाराने आरमोरी नगर परिषदेकडून पाडण्यात आले. आरमोरी येथील बीएसएनएल टॉवरजवळील ईलेक्ट्रीक सामान ठेवलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी व हातभट्टीची मोहा दारू अवैधरित्या साठा करून ठेवली जात होती.

पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी अवैध दारु विक्री करणा­ऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने आरमोरी शहरातील अवैध व्यवसायांविरोधात जून महिन्यात कारवाई केली होती. पुढील तपासादरम्यान अवैध दारूसाठा मिळून आलेली ईमारत देखील अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्याने नगर परिषद आरमोरी यांच्या समन्वयाने ती इमारत आता जमीनदोस्त करण्यात आली.

सदर गोदामात अनधिकृतपणे दारूसाठा ठेवणाऱ्या आरोपी सुनील जिभकाटे याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवैध दारु व चारचाकी वाहनासह 15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

गोदाम पाडण्याची ही कारवाई केवळ अवैध दारू विक्रीकरीता मर्यादित नसून, अशा बेकायदेशीर कारवायांना आश्रय देणा­या अनधिकृत बांधकामांवरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने या कारवाईच्या माध्यमातून देण्यात आला आहे.