गडचिरोली : जिल्ह्याचे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वैभव असलेल्या मार्कंडा देवस्थानाच्या संरक्षण व विकासकामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी मार्कंडा देवस्थानाच्या जतन-संवर्धनासाठी दिल्लीतील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
दिल्लीतील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यदुबीरसिंह रावत यांनी दि.30 जुलै 2026 रोजी डॅा.नेते यांना दिलेल्या पत्रातून मार्कंडा देवस्थानातील प्रलंबित संरक्षण व विकासकामांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉ.अशोक नेते यांनी दि.1 जून 2026 रोजी केलेल्या मागणीचा संदर्भ देत, प्रलंबित कामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित स्मारकांच्या संरक्षण, जतन व विकासासाठी आवश्यकतेनुसार विविध कामे हाती घेतली जातात. त्याच अनुषंगाने मार्कंडा देवस्थानातील मुख्य मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, चालू आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता महासंचालकांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
तसेच महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांचे संरक्षण व देखभाल प्रभावीपणे करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी पाठपुरावा
मार्कंडा देवस्थान हे गडचिरोली जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. या प्राचीन देवस्थानाचे जतन, संवर्धन आणि आवश्यक विकासकामे पूर्ण व्हावीत, यासाठी डॉ.अशोक नेते यांनी सातत्याने संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद म्हणजे गडचिरोलीच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मार्कंडा देवस्थानाच्या संरक्षण व विकासकामांना केंद्रस्तरावरून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद जीर्णोद्धाराला मिळालेली गती समस्त भाविक, नागरिक आणि इतिहासप्रेमींसाठी समाधान देणारी ठरणार आहे.
































