आरमोरी : ओडिसा राज्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज, कुरखेडा तालुक्यात नासाडी केल्यानंतर आता त्यांनी आरमोरी तालुक्यातील वैरागड व परिसरातील शेतकऱ्यांचे धानपीक पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी वैरागड व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची सूचना वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली.
ऐन धानपीक निसावण्याच्या काळात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये वैरागड येथील रवींद्र दुमाने, यादव मेश्राम, पांडुरंग सरदारे, दिलीप कांबळे, खुशाल नेवारे, रघुनाथ शिरसागर, उमाजी क्षीरसागर, रोहिदास बोदेले, मनोहर बनकर, नितीन धकाते, किशोर कोंडेकर व परिसरातील इतर शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आमदार गजबे यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत वैरागडचे उपसरपंच भास्कर बोडणे, बालाजी बोबडी, महादेव दुमाने, नेताजी बोडणे व परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.