चामोर्शी : नेताजी सुभाषचंद्र बहुउद्देशीय संघटना वसंतपूर यांच्या वतीने आठवडाभर चाललेल्या फुटबॉल सामन्यांचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती. आष्टी येथील फुटबॅाल संघाने विजयी चषक पटकावला.

खेळ म्हटल्यानंतर त्यात हार-जीत आलीच. विजयी संघाचे अभिनंदन, परंतु पराभूत संघाने पराजयाला हार न मानता पुढे प्रयत्न करत राहावे, त्यांना एक दिवस विजय नक्की मिळेल, असे मार्गदर्शन यावेळी नेते यांनी केले. तसेच गावातल्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास त्या सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले.
या फुटबॉल सामन्यांचे प्रथम बक्षीस आष्टीच्या संघाने पटकावले. त्यांना रोख 31 हजार आणि ट्रॉफी, तर द्वितीय बक्षीस वसंतपूरच्या संघाने (21 हजार व ट्रॉफी) तर तृतीय बक्षीस सुभाषग्रामच्या संघाने (10 हजार व ट्रॉफी) पटकावले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी खा.अशोक नेते यांच्यासह मंचावर भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, वसंतपूरच्या सरपंच सृष्टी सरकार, गौरीपूरचे सरपंच ह्रदय बाला, ग्रा.पं.सदस्य दीपक मंडल, ग्रा.पं.सदस्य संतोष कुंडू, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मंडल, तारक हलदार, पलाश घरामी, कुमारेश मंडल, अमेद्र मंडल, कौशिक सरकार तसेच मंडळाचे पदाधिकारी व गावातील नागरिक तथा खेळाडू उपस्थित होते.