सिरोंचा : मेडीगड्डा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना गुरुवार दि.१५ ला दुपारी सिरोंचा तहसील कार्यालय सभागृहात खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधीक स्वरुपात काही शेतकऱ्यांना चेक वाटप करण्यात आले.
या सभेच्या व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, सत्यनारायण मंचालवार, दामोधर अरिगेला, भाजपा तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, राजू पेददापल्ली (माजी नगराध्यक्ष), जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, अहेरी भाजपा तालुकाध्यक्ष रवि नेलकुद्री आदी मंचावर विराजमान होते. यावेळी मेडिगड्डा प्रकल्पबाधित काही शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात खा.अशोक नेते, आ.रामदास आंबटकर यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले. इतर सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे सरकार हे सर्वसामान्यांचे हित जोपासणारे, दाद देणारे, प्रश्न सोडविणारे सरकार आहे. मेडिगट्टा प्रकल्पबाधित शेतकरी काय होईल काय नाही या विवंचनेत होते. १५-२० दिवसापूर्वी मी शेतकऱ्याच्या उपोषण मंडपाला भेट दिली. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, जाणून घेतल्या. त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. तेलंगणाचे अधिकारी व पालकमंत्री यांच्याशी याबाबत संवाद साधला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोली आले असता तेव्हाही हा विषय लावून धरला. त्यामुळे ११ कोटी तेलंगणा सरकारने दिले व २६ कोटी राज्य सरकारने दिलेले असे ३७ कोटी रूपये प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ.आंबटकर म्हणाले, केंद्र व राज्य हे युतीचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मी सुध्दा विधान परिषदेत उचलून धरले होते. सरकारने सकारात्मक पवित्रा घेत आज तडीस नेला याचा आनंद आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप करण्यात आलेल्या शेतकऱ्यामध्ये भाविकराव प्रतापराव शिबाडी, प्रतापराव माधवराव शिबाडी, मोहन रामया रिककूला, भूमकका लचछया गुडा, रा.आरडा, गंगा जमुना प्रभाकररेड्डी, प्रभाकररेडडी बककारेडडी मुस्कूला, श्रीनिवास लक्ष्मीनारायण रंगूवार, रामप्रसाद शंकर रंगुवार, नरेंद्र लक्ष्मीनारायण रंगूवार यांचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.