मतदानासाठी कर्मचाऱ्यांना दिवसभर सुटी, शक्य नसेल तिथे दोन तास मिळणार

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आदेश

गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी सुटी जाहीर केली आहे.

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुटी देण्यात येते, किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेता, या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी मिळणार आहे.

ही सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.