भाजपच्या नेत्यांना डी.लिट् देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाचा गडचिरोलीत विरोध

निर्णय मागे घेण्याची संघटनांची मागणी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने भाजपचे नेते असलेल्या महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मानद डी. लिट्. पदव्या देण्याच्या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. विद्यापीठाने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेहमी एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करून ती विचारधारा विद्यार्थी व नागरिकांवर लादली जात असल्याचा आरोप करत त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांची उचलबांगडी करावी अशीही मागणी या संघटनांनी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांची चांदेकर भवन येथे बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठाने डी.लिट्. पदव्या बहाल करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा विरोध दर्शवून निषेध करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ ही एक सार्वजनिक संस्था आहे, परंतु कुलगुरू डॅा.बोकारे हे या विद्यापीठाला त्यांच्या आवडीच्या एका पक्षाचा, अथवा विचारधारेचा प्रचार करण्याचे केंद्र बनवून आपली पाठ थोपटून घेत आहेत, असा आरोप करत उपस्थित कार्यकर्त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

या बैठकीला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रोहीदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे रामदास जराते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंभोरकर, भाकपचे देवराव चवळे, माकपचे अमोल मारकवार, प्रसिध्द आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री कुसुम अलाम, संविधान फाऊंडेशनचे गौतम मेश्राम, गडचिरोली सिटिझन फोरमचे हेमंत डोर्लीकर, मुव्हमेंट फॉर जस्टिसचे धर्मानंद मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे प्रा.गौतम डांगे, आदिवासी विकास युवा परिषदेचे कुणाल कोवे, विनोद मडावी, सम्यक समाज समितीचे हंसराज उंदीरवाडे, रिपब्लिकन महिला आघाडीच्या ज्योती उंदिरवाडे, कल्पना रामटेके, युवा कार्यकर्ते नागसेन खोब्रागडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रल्हाद रायपुरे, नरेंद्र रायपुरे आदींनी भाजप नेत्यांना मानद डी.लिट्. पदवी देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध केला.

विद्यापीठाने आपला निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे.