गडचिरोली : पेसा ग्रामसभांमधील मोबिलायझर्स मजूर पदे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुणे येथे आज, दि.6 मे रोजी राज्यस्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी गडचिरोली जिल्ह्यातून पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पुण्याकडे रवाना झाल्या आहेत.
या आंदोलनात सिटूचे कॉ.अमोल मारकवार, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत. पंचायत राज संचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या अन्यायकारक व कामगारविरोधी निर्णयाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात येणार आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीने दिला आहे.
मुख्य मागण्या :
* पेसा मोबिलायझर्स पद रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
* सर्व मोबिलायझर्सना पुन्हा कामावर घ्यावे.
* आदिवासी भागातील रोजगार आणि हक्क अबाधित ठेवावेत.






























