गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत पदव्युतर शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा 18 महिन्यांचा ‘नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ईच्छुक विद्यार्थ्यांकडून 20 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले किंवा पदवीच्या अंतिम सेमिस्टरला असलेले विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात. या प्रशिक्षणात पुणे येथील नामांकित गॅलेक्सी आयएएस अकॅडमीच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे गडचिरोली विद्यापीठ परिसरात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड गडचिरोली व चंद्रपूर येथील जिल्हास्तरावरील केंद्रांवर होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित 200 गुणांच्या या परीक्षेतील गुणवत्ता यादी आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखतीच्या 25 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेची मासिके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, नोंदणी प्रक्रिया आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि 20 जूनपूर्वी आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
































