Home पब्लिक प्रॉब्लेम गडचिरोली पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी बैठक

गडचिरोली पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी बैठक

'एक युध्द नशे के विरुध्द' अभियान

गडचिरोली : पोलीस दल व शाळा-महाविद्यालये यांच्यात समन्वय साधून अंमली पदार्थांच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेत महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील शाळा, महाविद्यालयातील मुख्यध्यापकांची बैठक दि.30 जुलै रोजी घेण्यात आली. समाजात अंमली पदार्थांचे प्रमाण रोखण्याकरीता व शालेय विद्यार्थी व युवकांना अंमली पदार्थापासून दूर ठेवण्याकरीता हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने राबविण्यात येणा­या नशामुक्त भारत 2047 या अभियानाअंतर्गत “एक युध्द नशे के विरुध्द” या उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ही बैठक घेण्यात आली. यात पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी विविध शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांच्यासोबत संवाद साधून शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता आणने, व्यसनाची लक्षणे ओळखणे, तसेच योग्य वेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीदरम्यान शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाविरोधी जनजागृती करून विद्यार्थांना चांगल्या सवयी लागण्याकरीता, विद्यार्थांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व्यायाम, खेळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट¬ स्पर्धा, वत्कृत्व सर्धा अशा अनेक विषयांवर स्पर्धा आयोजीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या. शाळा, महाविद्यालय, वसतिगृह परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्रीबाबत गोपनिय माहितीकरीता तक्रार पेटी उपलब्ध करून तक्रारीची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयांमध्ये ‘अॅन्टी ड्रग कमिटी’ची स्थापना करुन वस्तिगृहामध्ये अँन्टी ड्रग सर्व्हेलन्स स्कॉड तयार करणे, शाळेच्या परिसरामध्ये संशयास्पद ठिकाण, खाद्यपदार्थ विक्री दुकाने, कॅन्टीन, स्टेशनरी दुकाने यामध्ये अंमली पदार्थ विक्री होत नसल्याची खात्री करून घेणे, ऑनलाईन पार्सल मागवित असलेल्या विद्यार्थ्यांवर, तसेच ई-सिगारेट सारख्या गोष्टींवर करडी नजर ठेवून विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन व प्राथमिक लक्षणे ओळखून समुपदेशन करण्याकरीता कळविण्यात आले आहे.

निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन, स्वस्थ व उज्वल भविष्याकरीता शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करून शिक्षणाचे महत्व समजून आपले नाव उज्वल करण्याकरीता जिल्ह्रातील सर्व विद्यार्थी व युवकांना पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.