Home दैनंदिन बातम्या अतिधाडस वनअधिकाऱ्याच्या अंगलट, कारसह पुराच्या पाण्यात ओढल्या गेले

अतिधाडस वनअधिकाऱ्याच्या अंगलट, कारसह पुराच्या पाण्यात ओढल्या गेले

दोरखंडाच्या मदतीने काढले सुखरूप

आष्टी : पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू नका, तसे करणे जीवावर बेतू शकते, अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केली जात आहे. मात्र त्याकडे कानाडोळा करत पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात आपली कार टाकून पलिकडे जाण्याचा प्रयत्न एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या चांगलाच अंगलट आला. कारसह या अधिकाऱ्याला पुराच्या पाण्याने नदीकडे खेचले. पण दैव बलवत्तर म्हणून कार झाडाला अडकली. प्रसंगावधान राखत त्या अधिकाऱ्याने कारवर चढून मदत मागितली. अखेर आष्टी पोलीस, महसूल आणि वनविभागाच्या चमूने दोरखंडाच्या मदतीने त्या अधिकाऱ्याला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

‘काळ आला होता, पण वेळ नाही’ म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना गुरूवारी आष्टी ते मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावर घडली. झाले असे की, मुलचेरा येथील पेडीगुडम वनपरिक्षेत्र कार्यालयात नव्यानेच रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी अझहरूद्दीन पठाण हे आपल्या क्रेटा कारने आष्टीकडून मुलचेराकडे निघाले होते. वाटेत पडणाऱ्या रेंगेवाही नाल्याजवळ आले असताना पुलावरून थोडे पाणी वाहत होते. आपली कार त्या पाण्यातून सहज निघून जाईल असे पठाण यांना वाटले. त्यामुळे ते पुलाजवळ जाताच पाण्याच्या लोंढ्याने त्यांच्या कारला प्रवाहाच्या दिशेने ओढले. पाण्यासोबत वाहात आलेल्या मातीमुळे गाडी सहजपणे सरकत होती. या अनपेक्षित घडामोडीने आरएफओ पठाण घाबरून गेले. पण नशिब बलवत्तर म्हणून की काय, त्यांची कार पाण्याच्या प्रवाहातील एका झाडाला अडकली. पठाण यांनी विलंब न करता लगेच कारचे दार उघडून अडकलेल्या कारवर चढून मुलचेराच्या तहसीलदारांशी संपर्क केला.

हे घटनास्थळ मुलचेरा पोलिसांच्या हद्दीत येत असले तरी पुरामुळे त्यांना तिथे पोहोचण्यासाठी विलंब लागला असता. त्यामुळे आष्टी पोलिसांना मदतीसाठी पाठविण्यात आले. आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्यासह त्यांची चमू, महसूल विभागाचे पथक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरखंडाच्या मदतीने पुरात अडकलेल्या आरएफओ पठाण यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुखरूप बाहेर काढले.

या धाडसी बचावकार्यामुळे एका अधिकाऱ्याला जीवदान मिळाले.