Home दैनंदिन बातम्या वाघाशी झुंज देत शेतकऱ्याने वाचवले स्वत:सोबत लेकीचे प्राण

वाघाशी झुंज देत शेतकऱ्याने वाचवले स्वत:सोबत लेकीचे प्राण

प्लास्टिकच्या टबने केला प्रतिकार

गडचिरोली : शेतात काम करताना वाघाने केलेला हल्ला एका शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने परतवून लावत स्वत:चे आणि आपल्या 17 वर्षीय लेकीचे प्राण वाचवले. ही घटना रविवारी पोर्ला वनपरिक्षेत्रातील कोरला वनक्षेत्रात दुपारी घडली. भाऊराव भगवान मशाखेत्री (42 वर्ष) असे त्या हिंमतवान शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, मशाखेत्री हे रविवारी दुपारी आपल्या मुलीला घेऊन शेतात पिकांना खत टाकण्यासाठी गेले होते. खत टाकून झाल्यानंतर ते काही क्षण विश्रांती घेण्यासाठी बसले होते. ते बेसावध असल्याचे हेरून मागे दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. पण त्याचवेळी मशाखेत्री उभे होऊन मागे वळले होते. त्यामुळे प्रसंगावधान राखत त्यांनी जवळ असलेला प्लास्टिकचा टब वाघाच्या तोंडावर मारणे सुरू केले. याप्रसंगी मशाखेत्री यांची मुलगीही जवळच होती. तिनेही आरडाओरड सुरू केली. यामुळे वाघ गोंधळला आणि ही शिकार आपल्या अवाक्यात नसल्याचे समजून त्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

या थरारक घटनेत भाऊराव मशाखेत्री यांच्या दोन्ही हातांना आणि पायाच्या बोटांना वाघाची नखं लागल्याने ते जखमी झाले. पण प्रसंगावधान राखत मोठ्या हिमतीने त्यांनी वाघाचा प्रतिकार केल्याने बाप-लेकीचा जीव वाचला.

या घटनेनंतर मशाखेत्री यांना तातडीने पोरला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

काँग्रेसचे युवा नेते दुष्यंत नामदेव किरसान यांनी रुग्णालयात जाऊन जखमी भाऊराव मशाखेत्री यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.