Home दैनंदिन बातम्या गणेशोत्सवासाठी गडचिरोलीत पोलिसांचे शिस्तबद्ध पथसंचलन

गणेशोत्सवासाठी गडचिरोलीत पोलिसांचे शिस्तबद्ध पथसंचलन

210 अधिकारी-जवान सहभागी

गडचिरोली : यावर्षीच्या गणेशोत्सवात गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस दलाचे शक्ती प्रदर्शन करत शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन (रूट मार्च) केले. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळराज जी आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विविध पथकांनी यात सहभाग घेतला.

यामध्ये पोलीस स्टेशन गडचिरोलीचे 12 अधिकारी व 64 पोलीस अंमलदार, विशेष अभियान पथक (C-60)चे 50 अधिकारी व अंमलदार, दंगा नियंत्रण पथक (RCP)चे 22 जवान व गृहरक्षक दलाचे 60 सैनिक, तसेच 3 MPV, 2 पोलीस वाहने, 4 सायरन बाईक रायडर्स तथा ड्रोन पथक आदींचा मिळून एकूण 210 अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता.

प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण

गडचिरोली पोलीस स्टेशनपासून निघालेला हा रूट मार्च कारगिल चौक, गोकुळ नगर, चनकाई नगर, राधे बिल्डिंग, चामोर्शी रोड, इंदिरा गांधी चौक, सराफा बाजार, मार्केट लाईन, ढिवर मोहल्ला, कारगिल चौक, आठवडी बाजार, मेन मार्केट या मार्गाने फिरून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. रूट मार्चदरम्यान शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, गर्दीची व संवेदनशील ठिकाणे कव्हर करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले.