गडचिरोली : बहुतांश महिला विविध क्षेत्रात कार्यरत राहून रोजगार मिळवित असल्याने त्या अर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. परंतु शहरी भागातील बऱ्याच महिलांकडे व ग्रामीण भागातील महिलांकडे विविध क्षेत्रांत काम करण्याची क्षमता असतानाही त्यांना समाजाकडून योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याने त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. या महिलांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून, तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. महिलांनी या योजनांचा लाभ घेतला तर त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत, समाजकल्याण विभाग व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने महिलांचे शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगर येथील न.प. प्राथ.शाळेजवळील खुल्या प्रांगणात केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून योगीता पिपरे बोलत होत्या.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुर्यकांत पिदुरकर, माजी नगरसेवक तथा भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी नप सभापती केशव निंबोड, माजी नगरसेविका लता लाटकर, माजी नगरसेविका बेबी चिचघरे, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुरमुरवार, तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधान आवास योजनांचे चेक, प्रधानमंत्री स्वनिधी योजनांचे चेक व मंजूर पत्र पिपरे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वीरेंद्र सोनवाने, सूर्यकांत मडावी यांनी केले.