उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

आचारसंहितेच्या काळात 23 गुन्ह्यांची नोंद

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अनधिकृत दारू गाळणे आणि विक्री करणाऱ्यांवर झालेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत 23 गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात 22 आरोपींना अटक करून 3 वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय 165 लिटर देशी दारू, 235 लिटर हातभट्टी दारू, 2 लिटर विदेशी दारू आणि 6 लिटर इतर राज्यातील दारू जप्त करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जंगलातील हातभट्ट्यांवर केलेल्या कारवायांमध्ये 2900 लिटर सडवा नष्ट केला आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 3 लाख 60 हजार इतकी आहे. यासोबतच छत्तीसगढ व तेलंगणा राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत बैठक घेऊन सतर्क करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आधी, निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.

पोलीस विभाग, वन विभाग, आर.टी.ओ., जी.एस.टी. आणि शेजारील जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आवश्यक तेथे नियमित व तात्पुरते सीमा तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 10 तपासणी नाके उभे केले आहेत. गडचिरोलीच्या सीमेवर चंद्रपूर जिल्ह्याने 9 तपासणी नाके, नागपूर जिल्ह्याने 2, भंडारा जिल्ह्याने 1 व गोंदिया जिल्ह्याने 2 तपासणी नाके उभे केले आहेत. तसेच छत्तीसगढ राज्याने 2 तपासणी नाके, तेलंगणा राज्याने 2 तपासणी नाके लावले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 18 सराईत गुन्हेगारांकडून कलम 93 अंतर्गत चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे. तसेच कलम 168 अंतर्गत 35 जणांना अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक आदीमध्ये सहभागी झाल्याचे आढळल्यास कारवाईची नोटीस दिली आहे.