वीज पुरवठ्यासह हत्तींचा बंदोबस्त करा, काँग्रेसचा उद्या चक्काजाम

देऊळगावमध्ये रोखणार वाहतूक

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून असताना अखंडित वीजपुरवठा दिल्या जात नसल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहे. नियमित वीज पुरवठा करण्यासह रानटी हत्तींचा धुमाकूळ थांबवून त्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी वारंवार मागणी करूनदेखील शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नसल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने 22 एप्रिल रोजी, देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या मागण्यांकडे वेधणार लक्ष

◆ विद्युत मीटरकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मीटर मिळाले नाही किंवा त्या जागी सोलर पंपसुद्धा मिळाले नाही.
◆ शेतकरी आणि लोकप्रतिनिधीकडून वारंवार विरोध होत असताना सुद्धा शासनाने विमानतळाकरीता पुलखल परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे, ते त्वरित थांबवावे व शेतकऱ्यांशी चर्चा करावी.
◆ चामोर्शी-भेंडाळा परिसरातील एमआयडीसीकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या शेतजमिनीचे दर वाढवून देण्यात यावे व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमीन अधिग्रहित करण्यात यावी.
◆ जिल्ह्यात शासकीय धान खरेदी-विक्री केंद्रावर व राईस मिलमध्ये वारंवार धान घोटाळ्याचे प्रकरण उघडकिस येत आहे, त्यामुळे त्याला आळा घालण्याकरिता उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
◆ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
◆ घरकुलाकरिता रेती उपलब्ध करून देण्यात यावी.
◆ मनरेगाअंतर्गत प्रलंबित असलेले थकीत पैसे त्वरित देण्यात यावे.
◆ जिल्ह्यातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्याचे काम मान्सूनपूर्व पूर्ण करावे.
◆ विविध विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबतात. ती रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी.