
काँग्रेसचे आजी-माजी जिल्हाध्यक्ष प्रचारासाठी सोबत फिरताना.
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9-अ मधील रिक्त जागेसाठी, तसेच कुरखेडा न.पं.च्या प्रभाग 16 आणि अहेरी न.पं.च्या प्रभाग 9 मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आज दि.18 रोजी रात्री जाहीर प्रचार थांबणार आहे. येत्या 20 जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. भाजप-काँग्रेस या पक्षीय उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळत आहे.
गडचिरोलीत प्रभाग 9 अ मधील भाजपचे नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ही जागा भाजपकडे कायम ठेवण्यासाठी भाजपने अंकुश उर्फ गोलू दिलीप नैताम यांना मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विनोद रामकृष्ण भांडेकर हे ताकद लावत आहे. याशिवाय सुनील भास्कर बावणे हे अपक्ष उमेदवारही आपले नशिब आजमावत आहे.
भाजपचे नेत्यांकडून प्रचाराला वेग
या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आ.डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भाजप-महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी झंझावाती प्रचार दौरा करून मतदारांशी थेट संवाद साधला. तेली मोहल्ला, हनुमान मंदिर परिसर, तसेच ढिवर मोहल्ला येथे डॉ.अशोक नेते यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी, विशेषतः महिला मतदारांकडून उमेदवार गोलू नैताम यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, “प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी भाजप-महायुतीच्या उमेदवाराला कौल द्या,” असे आवाहन त्यांनी केले. या प्रचारदौऱ्यात माजी आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, नगर परिषद बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर, महिला बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेविका वर्षा शेडमाके, कोमल नैताम, ज्ञानेश्वरी धंदरे, गुड्डी मारबते, ज्येष्ठ नेते गजानन येनगंदलवार, सुधाकर येनगंदलवार, सुधाकर पेटकर, तसेच अविनाश विश्रोजवार आणि सलीम शेख यांच्यासह भाजप-महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘हम साथ-साथ है’
काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांच्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि इतर पदाधिकारी हे प्रभाग पिंजून काढत आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन पक्षाचा अजेंडा पोहोचवल्या जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकत विश्वजित कोवासे आणि महेंद्र ब्राह्मणवाडे हे सोबत प्रचारासाठी फिरताना पहायला मिळाले.
































