गडचिरोली : सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे आणि दिल्लीतील जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले कॅाक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके काल (गुरूवारी) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी दक्षिण गडचिरोली भागातील काही शाळांना भेटी देऊन तेथील दुरवस्थेची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आठवीच्या विद्यार्थ्याला इंग्रजीत स्वत:चे नाव सांगता येत नसल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. काही शाळेच्या इमारती आणि भौतिक सुविधा अपुऱ्या असल्याचे त्यांना आढळले.
दिपके यांनी सुरूवातीला एटापल्ली तालुक्यातील डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. त्यानंतर कोसा अलिंगा आणि पायडीच्या शाळांनाही भेटी दिल्या. शाळेच्या इमारतींची दुरवस्था झाली असून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे डुम्मे येथील वर्गखोलीच्या एका भिंतीला करंट येतो अशी माहिती त्यांना मिळाली. शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी नाही. शिक्षकांची कमतरता, सहावी ते आठवीचे विद्यार्थी एकत्र बसवले जातात. गॅसअभावी चुलीवर स्वयंपाक केला जातो. विद्यार्थीनींच्या स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण नाही, हे मुद्दे समोर करत त्यांनी यासाठी शिक्षण प्रणाली आणि ती तयार करणारे सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात सुविधा कमी आणि प्रचारावर जास्त भर दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकार आदिवासींच्या जमिनी, जंगल हडप करून उद्योगपतींच्या हवाली करत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार तरी त्यांच्यापासून हडप करू नका, असे आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.
दिपके काल भामरागड येथे मुक्कामी होते. आज ते भामरागडमधील नागरिकांसोबत चर्चा करून ताडगावच्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन वर्धेकडे रवाना होणार आहेत.
































