एका कोंबड्यासाठी घेतला पुतण्याचा जीव, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

24 तासांत उलगडा, दोघांना अटक

चामोर्शी : पार्टी करण्यासाठी कोंबडा दिला नाही या क्षुल्लक कारणासाठी चुलत पुतण्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेणाऱ्या काकाला आणि त्याच्या सहकाऱ्याला जेलची हवा खावी लागली. या घटनेत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला पेट्रोल टाकून जाळले. पण अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे रहस्य पोलिसांनी 24 तासात उलगडत दोघांना अटक केली.

ही घटना चामोर्शी तालुक्याच्या येनापूर गावाजवळ बुधवारी दुपारी घडली. मनोज मेकर्तीवार (32 वर्ष) रा.सोमनपल्ली असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा काका सचिन मेकर्तीवार आणि राहुल गुंजेकर (रा.चिंचाळा, जि.चंद्रपूर) या दोन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सचिन आणि त्याचा मित्र राहुल हे पार्टी करण्यासाठी मनोज याच्याकडे त्याचा कोंबडा मागण्यासाठी गेले. पण मनोजने कोंबडा देण्यास नकार दिला.
त्यामुळे मनोजला घेऊन ते गावातील शंकर पुप्पलवार याच्या घरी गेले. त्या ठिकाणी मनोजला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याने दोघेही घाबरून गेले.

विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी दुचाकीवरून मृतदेह गावाबाहेरील नाल्याजवळ नेला. गावातून पेट्रोल आणून मृतदेहावर टाकून तो जाळला. पण संध्याकाळी नाल्याजवळ काय पेटत आहे या उत्सुकतेने गावातील काही लोकांनी तिथे जाऊन पाहिले असता मनोजचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यानंतर आष्टी पोलिसांनी पुढील कारवाई केली.