सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करा- डॉ.किरसान

नागरिकांच्या अपेक्षेनुसार प्रशासनाकडे केली मागणी

पूरग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करताना डॅा.नामदेव किरसान, सोबत इतर पदाधिकारी.

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात यावर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासाचिव डॉ.नामदेव किरसान यांनी 31 जुलै आणि 1 आॅगस्ट रोजी सिरोंचा तालुक्यातील नगरम, चिंतम्पल्ली, सोमनपली, कोत्तूर या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. ही गावे गोदावरी नदीकाठावर असल्याने आणि विशेषतः मेडीगट्टा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गतवर्षीपासून या गावांवर वारंवार पुराचे संकट येत असते. त्यामुळे या गावांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी डॅा.किरसान यांनी केली आहे.

मागच्या वर्षी या गावांना महाभयंकर पुराचा सामना करावा लागला. तशीच परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथील लोकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याने आम्हाला आपल्या गावाजवळच, पण सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करून द्यावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी डॉ.किरसान यांच्याजवळ केली. या मागणीला घेऊन डॉ.किरसान यांनी सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

पूरबाधित गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करून नळ, पाणी, स्वच्छतागृह, वीज इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार पेंटाराम तलांडी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष एम.ए.अली अहमद, माजी जि.प.सदस्य मनोहर सावकार यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.