Home पब्लिक प्रॉब्लेम भामरागडच्या अतिवृष्टीग्रस्तांना लॅायड्स मेटल्सचा मदतीचा हात

भामरागडच्या अतिवृष्टीग्रस्तांना लॅायड्स मेटल्सचा मदतीचा हात

उद्ध्वस्त कुटुंबांना मिळाला दिलासा

गडचिरोली : भामरागड तालुक्यात 30 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यात आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक साहित्य पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी सुरजागड येथील लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडने मदतीचा हात पुढे करून दाखविलेली तत्परता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

पूरग्रस्तांना तात्पुरती मदत मिळावी या उद्देशाने लॅायड्स कंपनीच्या पथकाने मदत साहित्य भामरागड तहसील कार्यालयात पोहोचविले. तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी रायल तलांडे, कोतवाल व इतर महसूल कर्मचारी, मुख्याधिकारी अभिजित सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीतेन्द्र मडावी व इतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नधान्याचे किट वितरित करण्यात आले.

आपत्तीच्या काळात तात्काळ मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे लॅायड्स मेटल्सने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. कंपनीच्या या संवेदनशील उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनी कंपनीचे आभार व्यक्त केले आहे.

भामरागडसारख्या दुर्गम व आपत्तीग्रस्त भागात शासनाच्या मदतीबरोबरच उद्योगसमूह, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, व्यापारी व दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. लॅायड्स मेटल्सने घालून दिलेल्या या आदर्शाचे अनुकरण करत अधिकाधिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्यास अनेक कुटुंबांना नव्याने उभे राहण्याचे बळ मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.