
देसाईगंज : राज्य राखीव पोलीस दलाच्या विसोरा येथील कॅम्पमध्ये 9 ऑगस्ट रोजी ‘जागतिक मुलनिवासी (आदिवासी) दिन’ अत्यंत उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या आणि आदिवासी आद्यक्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयोजकांच्या वतीने कृष्णा गजबे यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात गजबे यांनी, “आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्यासाठी व तिचा सन्मान करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत व्यक्त केले.
पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मनमोहक नृत्य सादर केले. पारंपरिक वेशभूषा आणि नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला एस.आर.पी.एफ. कॅम्पचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































